Tuesday, May 24, 2011

तू भेटत रहा ...!



तू भेटत रहा ,
कधी शांत गार वा-यातून .
कधी चांदण्यांच्या पसा-यातून ..

तू भेटत रहा ,
कधी पावसाच्या पहिल्या भिजेतुन..
कधी लक्ख विजेतून..

तू भेटत रहा ,
कधी इन्द्रधनुच्या सज्जेतुन..
कधी नववधुच्या लज्जेतुन ..

तू भेटत रहा ,
कधी विरहाच्या अंगारातून ..
कधी मिलानाच्या श्रुंगारातून ..
  
 

तू भेटत रहा ,
कधी स्थितप्रद्न्य  ध्यानातुन.. 
कधी चंचल विज्ञानातून..

तू भेटत रहा ,
कुणा माउलीच्या डोळ्यातून.. 
कधी तिच्या मात्रुत्वाच्या सोहळयातून.. 

तू भेटत रहा ,
पापण्याआड अश्रुंच्या साठवातुन
डोंळयाआड जपलेल्या आठवातुन.. 

तू भेटत रहा ,
अबोल शांत चांदण्यातुन
ग्रीष्माच्या कठोर भाजन्यातुन..

तू भेटत रहा ,
अर्जुन झालो.. तर कृष्णसखा बनुन..
झालोच दुर्योधन... तर कर्ण पाठीराखा बनुन ..

तू भेटत रहा.....!!!

विनायक 
२६ मार्च ०९

Sunday, May 15, 2011

निरोपाच बोलण ...!


निरोपाच बोलण जरा लांबव..
थोड़ा श्वास घे ..
उछवासही टाक उगाच ..
अन बाकीच डोळयातुनच संपव.. !

विषय वाढवायचाच म्हणुन आठव ....
तो पुनवेचा चंद्र,
अमावस्येचा अंधार
अन् बाकीच आठवणीतच संपव ...!

तसा काही विशेष आठवु नको...
सोबत पाहिलेली स्वप्न ही ,
अन् मनोराज्य ही...
तुटणारां तारा पुन्हा दाखवू नको..!


जमलंच तर राहू दे तसाच...
अंगावरचा शहारा,
अन् स्तब्ध राहिलेला वारा..
डोळयातलं पाणी वाहू दे उगाच...!

विसरून जा ती पाउलवाट
तो भरतिचा चंद्र,
आणि ओहोटीची लाट
वाळुंतली नावे ही पुसून टाक...!

आता इतका करतेच आहेस तर..
पुनॅजन्माच वचन देऊन टाक,
अजुन थोड़ा खोट बोलून टाक
त्या जन्मी तरी "पुन्हा भेटू " म्हणून टाक...!


-- 

Thursday, May 12, 2011

तीळ ..


पाठीवरचा तीळ ती कण -कण लपवून गेली ..
तीळ तीळ मरणं ,हळू हळू समजावून गेली ..!!

ती आली जेव्हा बहुपाशात,रमली अशी की,
अप्सरांनाही ओढ माझ्या बाहुंची भुलवून गेली..!!

दीसली बेफ़िकिर अशी जेव्हा वळली कुशीवर ,
समुद्र लाटांस फ़ेसाळत्या ,बेफ़ामी शिकवून गेली..!!

हासली जेव्हा किण-किण चांदण्यापरी,
पाण्यास ’खळाळणे’ विशेषण सुचवून गेली..!!

स्पर्श होता उन्मत्त माझा,दात ओठी दाबुनी,
लाजाळूस त्या खरी सलज्जता देउन गेली..!!

संग दोन घडीचा करूनी भन्नाट ऐसा..
पाप-पुण्य सारे मिथ्या ऐसे वदवून गेली..!!

धुंद ओलेत्या तनुचे दाविले ब्रम्हरूप जेव्हा,
वेद-मंत्र-गीता-पोथ्या सारे जाळून गेली.. ...!!


कंठी कृष्णदोरा बांधता दुस-या कुणी..
श्वास आठव्या जन्माचा रुजवून गेली..!!

खूण काय पटावी त्या उनाड जन्मी ??
या जन्मीचा तीळ ,जिव्हेवर सजवून गेली..!!

तीळ-तीळ,क्षण-क्षण,पळ-पळ,,,,,,,,,,,जन्म-जन्म,
भेटू नक्की ..देऊन शब्द ती ,विसरून गेली...!!

विनायक
१७ एप्रिल २०११

Wednesday, May 11, 2011

मिठीसाठी..

देवा,तिला एकदा मिठीत आणून देशील?
किंवा तिनेच मारावी मिठी असे काही करशील..?
म्हणजे बघ..

ऑफिस तिचं जरा उशिरा सुटू दे..अन माझं जरा लवकर..
बॉस तिच्यावर चिडू दे ..अन झापू दे तासभर..
अन ऑफिस खाली उतरताच मी दिसावा गाडीवर..!!

अन बघ असं कर..
उगाच अचानक पाऊस पाड...गर गर वाऱ्यासोबत..
त्यात उगाच एक वीज पाड .. कड कड ढगासोबत ..
सगळीकडे अंधार कर तेव्हाच..एका चुकीच्या वळणासोबत.!!

किंवा मग असं कर..
एखादा पदार्थ तिचा चांगला बनू दे..
सहज एखादी तिला कविता सुचू दे..
"जमून आलंय सारं" हे सांगण मला जमू दे..!!

अन असं झालं तरी चालेल..
टीव्ही वर आंधी लागू दे..
अन ते "जी मी आता है...." वालं कडवं..
अन तिरक्या नजरेने मी फक्त बघावं....

देवा, तू फक्त एवढंच जमवून देतो ?
बाकी मिठीच मी बघून घेतो..!!!
विनायक..

Tuesday, May 10, 2011

कॉफी शॉप ..२


दो कॉफी एक के बाद एक..
ती मुद्दाम अशी ऑर्डर द्यायची ..
अन मला उशिर झाला कि ..
एक एक कॉफी हळु हळु प्यायची ...१

पहिली कॉफी पिताना
ती जाम सुंदर दिसायची ..
अन शेवटच्या कॉफीत
चमचा थोडा जोरात फिरवायची ..२

मि हळुच नंतर येउन
कॉफीत थोडि साखर टाकायचो ,
अन उशिर झाल्याचं..
रोज नवं कारण सांगायचो ..३

खर तर थोडा आधी येउन,
आडोशाला लपून बसायचो ..
आधीचा अन नंतरचा असा

थोडा जास्त वेळ तिला बघायचो ..

भेटल्यावर ती..
दहाच मिनिटे थांबायची ..
तेवढीच भेट आमची ..
दवाच्या थेंबांची ..५

दहा मिनिटात मग आम्ही ..
सगळं टिपायचो ..
दवासारखं आटोपशीर वागून ..
लगेच मिटायचो...६

ती निघताना नेहमी ..
आमच्या लग्नाचं बोलायची ..
अन स्वप्नातली गाडी आमची ..
नोकरीवर येऊन थांबायची ..७


पगार इतकाच पुरणार नाही..
असा तिचा बाप म्हणायचा..
स्वत: मास्तर अन जावयाकडून ..
महिन्याला लाख मागायचा ..८

म्हणाली एकदा लवकर ..
दुस-या नोकरीचं बघ ..
घरचे माझ्यासाठी ..
बघतायत अख्खं जग ..९

पैशाशिवाय कसा नक्की ..
करणार आपण संसार..
प्रेम थोडा वेळ ,
पैसाच खरा आधार ...१०

आज भेटायचं म्हणून ..
आज लवकर निघुन..
कोफ़ीशॉपात पोहचलो
सोबत साखर घेउन..११

पण ती आलीच नाही ..
नॉट फोर एनी सेक ..
अन मी घेत राहिलो कॉफी
एक के बाद एक..१२

.
.
.

..
सत्य घटनेवर आधारित ..
यातलं फक्त 'मी'पण वेगळं..
ते बाजूच्या टेबलावर बसायचे ..
पण 'मी' अनुभवलंय सगळं ..१३
.
.
.
विनायक
(कॉफीच्या कविता )

Monday, May 9, 2011

कॉफी शॉप....१

आपलं कोफी टेबल आठवतं?
तिथ थोडी धूळ होती साचलेली ..
हळुवार फिरवला हात अन दिसली ..
नक्षी तू आखलेली ...!!

अन सारं समोर उभं राहिलं..
अगदी काल घडल्यासारखं..
जुन्या सा-या पानांवर..
नवं दव पडल्यासारखं..!!

मला कळावं म्हणून ..
तुझा चाललेला खटाटोप ,
अन हातची घडी घालून 
बोलणारा मी बिनडोक..!!

मला आवडतो म्हणून 
तू माळलेला गजरा..
अन मी मिळवत नव्हतो .
नजरेला नजरा ...!!

मी येताच ,'येते' म्हणणारी 
तुझी मैत्रीण हुशार ...
अन तू दिसताच ..
माझे मित्र पसार ..!!

छोटू ठेवायचा ..
एकच कप दोघात ..
त्याला दिसायची बहुदा ..
एकच नोट खिशात ..!!

अजून थांबू म्हणणारी तू..
घड्याळाकडे बघणारा मी..
थंड होणारी ती ...
सगळ्यात स्वस्तातली कोल्ड कॉफी ..!!


डोळ्यात डोळे घालून ..
तू विचारलेला प्रश्न ..
अन उत्तर ऐकताच ..
डोळ्यात तुझ्या आसवांचा जश्न ..

नाही म्हणून वाटलं..
करून घेतली सुटका...
वास्तवात आलो एकदम..
बसून कॉफिचाच चटका..

सगळ्यातून सुटलेला मी..
कॉफी शॉप मध्ये अडकतो..
कॉफीच्या वाफेत अजूनही..
तुझ्याच बटा हुडकतो..!!

विनायक...
(कॉफीच्या कविता )

Sunday, May 8, 2011

वृन्दावन

तुझ्या माझ्या घरांच अंगण पाहीलं,
की मन आजही थरारतं..
जस पहिल्या अवचित सरींनी 
पान अन पान शहारंत..

माझ्याकडचा निशिगंध वेडा,
आजही तसाच बहरतो..
तू यावीस खुडण्यास म्हणुन
गंध तुझ्या घरभर फिरवतो..

तू लावलेला मोगरा,
आजही जोमाने फुलतो..
हलकासा सुगंध त्याचा मग 
माझ्या मानत सलतो..
अंगणातली रातराणी तुझी
आजही निस्तब्ध आहे ..
माझ्या घरचा प्राजक्त मात्र
तिच्यावरच लुब्ध आहे

आपण मिळून लावलेलं
रोप आजही लाजतं..
माझ्या वरून वहिल्या वार्यानेही
लगेच पानं मिटतं

माहेरी आलीस की, एकदा
बाजुच्या वृन्दावनात येउन जा..
अजूनही तहानलेल्या तुळशीला,
पाणी थोड़ा देऊन जा.. 

--------------------------------------विनायक

Monday, May 2, 2011

चंद्र , ती आणि मी ...


आता अंधार पडेल
मग चंद्र येईल साथीला ,
मी हरवून जाईन ,
त्याच्याशी गप्पा मारेन
त्याला विचारेन तुझ्याबद्दल ..
तो म्हणेल -आहे बरी..!
मी म्हणेन " सांग न हकीकत खरी .."

तो डिवचेल मला ,
म्हणेल - हातात मोबाइल समोर कंप्यूटर ...
sms पाठव ई-मेल कर .....

"पाठवला असत्ता रे ...
पण अशी मजा सेंड मधे नाही
प्रेमिकेचा क्षेम विचारायला
तुझ्यासारखा friend नाही ..."

मग खुलेले तोही ..
सांगेल,
तू येतेस आजही ..
त्या खिडकीशी ..
त्याला बघायला ..

"बर ,अजुन ?"

सांगेल की,
तुज्या तारकांचा हिशोब जास्त आहे
"कसा ?"
म्हणेल
उशिरा लागतो डोळा तिचा,
जाग ही लवकरच येते तुझ्या पेक्षा

सकाळी उठून सवयीने..
तुला करते पहिला message ...
"पण..पण.. मला नाही येत तिचा message "

तू साला IT वाला .. logical !
तिने स्वत:चा no. save केला आहे तुझ्या नावाने
त्याच नावाला message करुन ...
हसते हळूच तुझा नाव Inbox मधे बघून ..
"बर बर अजुन?"

हसेल गालात ,
अजुन काय ?
बास इतकच...!

आहे बरी .. तुझी परी...!
अन
मग सांगेल हकीकत खरी...!

संसारात रमली आहे .. सुखात आहे..
Inbox मधले message वाचते ..
अन.. delete ही करते..
पोराला झोपवाताना उशीर होतोच ..
नव -यासाठी डब्बा ही लवकर उठून बनवते..

मी निघताना पहाटे शेवटी ...
म्हणेल , एक मात्र खरं सांगू ..?
कधी तरी हरवून माझ्याकडे बघताना ,
नवरा विचारतो ,
चंद्रामधे कोणाला हुडकतेस ?
ती म्हणते ,
"तुलाच ...........................!"

..................................................विनायक

|| पत्र कविता ||


पत्राला जोडावी म्हणतोय कोरी पानं थोडीशी..
अन करेन म्हणतोय त्यावर एक कविता कोरीशी ..!!

अगदी ओठांवर अलगद येऊन थांबलेली..
आठवांनी आपल्या नखशिखांत सजलेली ..!!

'श्री' च्या जागी सजवेन चंद्र तुज्या बिंदीचा ..
रंग भरेन त्यात वाट पाहणा-या मेंदीचा .. !!

जिथे लिहितात 'प्रिय' तिथे माझे ओठ टेकवेन ..
अन चोरट्या 'त्या' क्षणांना, तुला पुन्हा भेटवेन..!!

'पत्रास कारण' म्हणून एक फूल पाठवेन मोग-याचं..
जे जपून ठेवलंय कधीचं तू माळलेल्या गजा-याचं ..!!

'मायन्या'मध्ये कविता लिहीन अन ठेवेन एक कळी ..
अन त्यात स्वल्पविरामासारखी मांडेन तुझी खळी..!!

शेवट करताना चारोळ्या टाकेन खास खास ..
मिठी बिठी शब्द वापरून देयीन हलकासा भास ...

नेहमीप्रमाणे 'तुझा' च्या पुढे नाव लिहीन माझं च ..
कारण तू मात्र नक्की मनात म्हणशील माझाच !!

आता या पत्रावर तुझा पत्ता लिहावा म्हणतोय ...
'पत्त्या'च्या जागेवर सये काळीज काढून ठेवतोय !!

ता. क.

नेहमीप्रमाणे 'तुझा'च च्या पुढे नाव लिहीन विनायक ..
अन तू लाडिक रागाने मनात वाचशील नालायक ..

प्रलयगीत

 दिवस मोगरा होतो  रात्र सायली होते ,  तुझिया अस्तित्वाने  श्लोक-शायरी होते।  मी धुनी पेटवत असता तू यज्ञाचे मंतर गाते , मी अलख निरंजन म्हणतो ...