Tuesday, December 12, 2017

गोष्ट असेल छोटीशी ..

गोष्ट असेल छोटीशी ..
पण त्याचीही कथा करतील..
तु सुस्कारे सोडशील साधे..
लोक त्याचीही गाथा करतील ..१

शिस्तभंगाचे कलम
लागेल तुझ्या बटांना ...
कारणे दाखवा नोटीस..
देतील तुझ्या व्यथांना २

तुझ्या हातांची थरतर..
लोक चवीने चघळतील ..
हातांच्या सुरुकुत्याही मग
खपली सारख्या उसवतील..३

हे बसलेच असतील..
सरल्या वर्षांचे अंतर टपण्या..
हीरव्या चुड्यावर ही
करतील बिलंदर टीप्पण्ण्या..४

लोकांची  जात  आहे ,
लावतील जीभ टाळ्याला..
सीतेने किती सोसले
कधी कळलं धोब्याला ?५

तू कपाळी नको दाखवू ..
एक सुद्धा आठी ..
लोक त्या रेषांतून सुद्धा
मोजतील आपल्या भेटी ..६

एक एका प्रश्नांनी
उसवतील अनेक गाठी..
गोष्ट माझीच असेल ..
पण तू नको आणुस ओठी..७

गोष्ट असेल छोटीशी ..
पण त्याचीही कथा करतील..
तु सुस्कारे सोडशील साधे..
लोक त्याचीही गाथा करतील ..

विनायक
२८/१२/११

Wednesday, December 6, 2017

प्रार्थना , हे कविता माये !

हे कविता माये ,

सगळ्यांचे भले कर..!
इथे खुपजण पोटुशी आहेत ....
त्यांचे भले कर...!

कुणाच्या पोटी प्रश्न दे..
तर दुसऱ्या पोटी उत्तर दे..!
तिसऱ्याला ते चुकीचे ठरवू दे!!
चौथ्या पोटी हे सगळे पटवून दे ..!
कुणी राग नावाच्या पोराला जन्म दिला
तर दुसऱ्या पोटी शांती नावाची पोरगी दे..!

इथे खुपजण लग्नाळु आहेत ..
सदाहास नावाच्या सगळ्या पोरांना ...
करुणा नावाच्या पोरींची ओळख करुन दे...!
सगळ्याना थोडं  थोडं  तोलून दे..
जमलंच  तर एकमेकात माळून दे..!

इथे काहीजण स्वप्नाळू  आहेत ..
काहींची स्वप्न लवकर पूर्ण कर..
काहींची मोठी करत.. अपूर्ण ठेव..
निराश लोकाना त्यांना भेटव..!
यांची निराशा लवकर संपव ...!

इथे खुपजण धर्मांध आहेत ..
त्यांना डोळस कर ....
'तो' नेहमीच तुमच्यासाठी लढायला येतो म्हणावे ..
तुम्ही 'त्याच्यासाठी' लढु नका म्हणावे ...!
इथे खुपजण ओळख हरवले आहेत ..
आपोआप चांगदेव झाले आहेत..!
तू कुणाला तरी मुक्ताई बनव..
तिच्या हातून पासष्टी लिहून दाखव ..

इथे खुपजण काव्याळु आहेत ..
त्यांच्या कविता लवकर कागदावर उतरवून घे ..
त्या  सगळयांना कळु दे..
अर्थ त्यांचे थोड़े फार तरी वळु दे..!!
मनातलं  सगळे तुझ्या रुपाने उतरु दे..!
सगळे सगळे तुझ्या रुपात सामव..
अन खुप सारे विषय अजुन..
असे थोडक्यातच संपव..!!!!!

विनायक

प्रलयगीत

 दिवस मोगरा होतो  रात्र सायली होते ,  तुझिया अस्तित्वाने  श्लोक-शायरी होते।  मी धुनी पेटवत असता तू यज्ञाचे मंतर गाते , मी अलख निरंजन म्हणतो ...