Monday, November 5, 2012

उशीर ..!


तुम्ही सगळेच निघून जा ..
लवकर निघा बरं..
उशीर नका करू ..

तुम्ही गेल्याशिवाय ,
ती नाही येणार ..

तुम्ही उशीरा गेलात तर,
तिलाही नंतर घरी जायला उशीर होईल ..

नवरा खाष्ट आहे तिचा,
घरी परतायला उशीर करून चालत नाही .. !!

म्हणून म्हणतो ,
लवकर निघा ..
लगबग करा 
उगाच उशीरापर्यंत ताटकळत नका बसू ..
ती येऊन गेली 
आणि 
तिच्या घरी सुखरूप पोहचली ..
की ,
.
.
.
कावळा शिवेल नक्की पिंडाला माझ्या ..!!

Saturday, May 19, 2012

शर


तुला माझ्या नावाने येतो काय गं अजुन ज्वर ..?
माझ्या नावचा तुला रुततो काय गं अजुन शर..?

तळ्याकाठचा नीरज फ़ुलतो काय गं ओंजळभर..?
लाजाळुसा लाजकाटा येतो काय ग देहभर..?

पहाटेचा केशरसडा घेतेस ना भरुन उरात..?
माझा स्पर्शाभास होतो काय गं अजुन फ़ुलात..?

दवभिजला मोगरा बहरतो का गं वेण्यात अजुन ..?
काजळचिंब पाउस पसरतो का डोळ्यात अजुन..?

मृगजळी होकाराची अजुन आहे थोडी आशा..
काष्ठरेघी नकाराची अजुन उतरत नाही नशा...

अजुन येत असेल ना आभाळहुंदका दाटुन मनात..?
अजुन घेत असशील ना पृथापदर ओढुन जनात..?

कुणी,कुठे,कसे,काय,कशाला,किती विचारु अजुन अजुन..?
वचन दे आता, स्वप्नदेशी या नाही येणार पुन्हा फ़िरुन..


विनायक
१/१/२०१२

अंदाज


मला आता कशाचाच अंदाज येत नाही ..
इतका घुसमटलो की माझाही मला आवाज येत नाही ..!!

किती प्रवास करतो थकतो  कितीकदा मी ,
तरी जो हवा मला तो गाव येत नाही ..

किती वेळा ठरवले विसरून जायचे तुला ..
तरी ओठावर  दुसरे नाव येत नाही ..

हात जोडतो किती प्रार्थना करतो बरी ,
तरी डोळ्यात अजून तो भाव येत नाही ..

मी उपचार अनेक केले, दाबले व्रण सारे ,,
आता कुणा समोर ही तू दिला घाव येत नाही ..

मी प्रयत्न केले खूप रक्त आटवले सारे ..
पण हृदये तोडण्याचा अजून सराव येत नाही ..

विनायक

कवितांची बंदुक


कवितांची बंदुक करावी ,

त्यात वेग वेगळ्या भावनांच्या कविता,
गोळ्या म्हणून भराव्या ,,
शरीरापेक्षा जास्त त्या मनाला भिडाव्या  ..

अन हवे तेव्हा हव्या तशा झाडाव्या..

एक गोळी झाडावी ,
हिच्या गोल गोब-या गालावर ..
खळीतुन घसरुन ती..
नथीत जाउन अडकावी..
आणि नथ उतरवुन ..
हिरव्या कच्च श्रुंगारात नहावी ..
त्यातुन मग वंशवेल बहरावी..

एक गोळी झाडावी तीच्या विरहाची
तीच्या  संसारावर..
तिला अन तीच्या नव-याला सात फ़ेरे घालुन..
तीच्या मंगळसुत्रात अडकावी..!
अन मग सात जन्म-बिन्म सारे हिशोब पुसावी !!


एक गोळी झाडावी..
आभाळातल्या कुणा विभुतीवर..
इथे त्याच्या नावे चाललेल्या विकृतीवर!!
त्या गोळीने मारुन टाकावीत बेगडी संस्करणे
पिढ्यांपिढ्या चालत आलेली ..!!
अन पिढि दर पिढि वाढत आलेली..!

एक गोळी झाडावी..
जुन्या सा-या आपल्याच कवितांवर..
टुकार शब्दांचे चुकार प्रयोग पुसावेत तिने,
अन त्यांचे भिकार प्रदर्शनहि...
अन खरेतर त्या प्रदर्शनाचे समर्थनहि..!

एक ’कविता’ झाडावी..
अशीच मुक्त ..
तिला कशाचे बंधन नसावे..
नसावी तीच्यात मांडणी,
अन नसावी कुठलीच धाटणी....
मुक्त एकदम मुक्त ..!
अन तिनेच फ़ीरुन येउन,
डोक्यात जाउन आपल्याच ,
जीव घ्यावा एकदाचा..!

विनायक

Saturday, March 17, 2012

नक्षत्रांचा प्रवास..

 चल आता सुरु करूत ..
आपला नक्षत्रांचा प्रवास..
सापदलीच तर जिन्कुत सारी ..
आणि करुयात त्यांची आरास..

मग आणखी दोघे चौघे
येतील आपल्यामागे मोहून
कहिजन आपल्यासाठी..
तर काही नक्षत्रांनी वेडावून ..

प्रवासात त्यांना आपल्या
पुढचा स्थान देऊ..
आलीच संकटे सामोरी..
तर त्यांना आपल्या कवेत घेऊ ..

का म्हणुन काय विचारतोस?
या प्रवासाचा एक नियम आहे..
सुरवात करणा-यांनी लाढायचं
तरच मागच्यांचा निर्धार कायम आहे..

हा लढा लढताना आपल्यासाठी आलेले
येतील स्वत:हब लाढायला..
अन नक्षत्रांनी वेडावलेले मागेच रहातील..
हार जीती च सोहळा पाहायला ..

जिंकल्यावर जे सोबत लाधले त्यांना
आपण म्हणु काही नका घेऊ..
जे मागे राहिले त्यांना मात्र
आपण नक्षत्रे देऊ..

सोप्पा आहे लाढणा-यांना आपोआप
मिळतात घाव आणि जखमा ...
म्हणुन मागे रहना-यांना
आपण देऊ मोठ्या रकमा...

लढणारे काहीजण मग
सोबत प्रवास नको म्हणतील..
आपण समजूत घालू त्यांची..
तेही शहाण्यासारखे 'हो' म्हणतील.!

मग मागे रहाणारे हट्ट करतील..
आणखी काही नक्षत्रेहि मागतील ..
देऊन टाकू आणखी काही..
निदान हे सोबत तरी राहतील..

आपला प्रवास सुरु राहील..
कुठे सहज साध्य श्रेय दिसेल
तेवा मागचे लोक पुढे सरकतील
सहजच्या यशात त्यांना ध्येय दिसेल..!

मग आपल्यासमोर करतील ते
कर्तव्याच्या , वीरश्रीच्या गोष्टी ..
आपण लगेच भाळूत त्यावर
देऊ त्यंच्या म्हणण्याला पुष्टी..

सहज मिळणारा विजय..
पण तो हि 'हे' लाम्बव्तील..
मग आधीचे लढणारे
तो खेचून आणतील ..

यावेळेस हि आपण तेच करू..
म्हणू सुरुवात यांनी केली..
म्हणून मान-सम्मान यांचा..
यांनी चांगली लढत दिली..

तरीही होणार नाही
त्या काहींचे समाधान ..
म्हणतील नंतर आलेल्याना
देऊ नाक काही स्थान..

आपल्याला खरे माहित असूनही
आपण मात्र मौन बाळगू.
यांच्य्शी सलगीने अन
त्यांच्याशी कठोर वागू..

मग एकदा मात्र
होईल जाणीव आपल्याला..
कि आपला नक्षत्रप्रवास
आता आलाय संपायला..

याची जाणीव होईल
या दोन्ही लोकांना ..
मग दोघेही उभारतील
दोन विरुद्ध टोकांना

त्यातही एक गम्मत असेल.
ज्यांची पाठराखण केली आपण..
तेच उभारतील समोर..
घालून नवं कोरं कुंपण ..!!

आणि ज्यांना फसवलं
आणि राबवलं आपण प्रवासात..
ते तसेच पाठी उभे रहातील..
असतील आपल्याच सहवासात..

मग आपला सुरु होईल
प्रवास अनंताचा ...
लढणारे आपल्यासाठी लढत राहतील.
सुरु करतील प्रवास नव्या नक्षत्रान्चा ..!!

मागे रहाणारे भांडत बसतील..
आपसात वाद घालतील...
घाव करतील स्वार्थासाठी ..
आपणच दिलेल्या नक्षत्रांसाठि..

मग उमजेल काहींना
आपल्या नक्षत्र प्रवासाचे 'मर्म'.
बिनकामी अन खोटी सारी नक्षत्रे ..
अखंड प्रवास हेच खरे 'कर्म'...!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

विनायक
१० जुलै 2006 


प्रलयगीत

 दिवस मोगरा होतो  रात्र सायली होते ,  तुझिया अस्तित्वाने  श्लोक-शायरी होते।  मी धुनी पेटवत असता तू यज्ञाचे मंतर गाते , मी अलख निरंजन म्हणतो ...