Thursday, June 22, 2017

उत्तान कविता

आधी कविता लक्षात रहायची..एकदम बरोबर ठिकाणी सापडायची..
तीच्या बटांत मिळायची..तर कधी खळीत धडपडायची..

आधी कविता मानेला हिसका देउन मस्त मुरका मारायची..
गुलाबी थंडीच्या सिगारेटचा खोटा झुरका माराय़ची ..

माझ्याकडे आली की भुकेल्या नजरेने बघायची..
अन जाताना मलाच नव्या ओळी भरवायची..

मी गेलो तीच्याकडे की हसत स्वागत करायची ..
मला परत पाठवताना,नवी उर्मी उरात भरायची..

मधल्या कित्येक दीवसात मी भेटुच शकलो नाही..
मी दार ठोठावले अनेकदा पण तीला गाठुच शकलो नाही..

अचानक कुणी म्हणाले फ़ीरते आहे ती वेड्यासारखी बाजारात..
मी धावत गेलो तिच्याकडे ,शाल पांघरुन आणले घरात..

घरी येताच हसली कशी-बशी..आणि बिलगली एकदम उराशी..
पुन्हा हसली शाल-बिल सोडुन..अन शब्द शब्द तीचा उठला पेटुन..

मला एकदम जाणवलं..मगाशी हीने हासुन मला हीणवलं..
माझ्या प्रगल्भतेला मुळापसुन हलवंल..

कविता आता उत्तान झाली ..
वणव्याने पेटलेलं तुफ़ान झाली ..

जी कविता जायची डोक्यात , ती कविता आता जाते देहात ...
हात फ़ीरवता पाठीवरती , मुके घेते छातीवरती...

मधुनच उगाच रुसुन बसते, आकाशाकडे पहाते मग्न होऊन..
ओळी सा-या नीरेसारख्या सोडुन बघत रहाते, नग्न होऊन...

मला म्हणाली या कानामागुन त्या कानामागे नख लाव..
शब्दनखांनी तुझ्या लालेलाल होयीन अशी धग लाव..

म्हणालो बये बये तुला झालंय काय?तु होतीस बरी संस्कारी..
पुन्हा पदर ढाळुन म्हणाली, हीच खरी अदाकारी..

एका मध्यरात्री उठलो मी चवताळुन..विचारले तीला घालुन पाडुन..
पुन्हा तशीच हसली स्वत:शी ,अन झोपी गेली तोंड लपवुन..

पहाटे पर्यंत मी तीच्या अनावृत्त देहाकडे अनिमिष पहात होतो..
अलंकार,भरजरी शब्द,वृत्त,मात्रा,पुन्हा द्यायचा विचार करत होतो..

जाग आली सकाळी..म्हणजे माझा डोळा लागला..
हात फ़ीरवता बिछान्यावरती..एक कागदाचा बोळा लागला..

तीने माझे विचार वाचले होते , पुन्हा तीच्यावर बंधन घालायचे..
लिहीले होते पुढे ..की तिला आता पुर्ण मुंडन करायचे..

ती विद्रुप चेह-याने चिटो-यातुन त्या बोलायला लागली..
बोलायला कसली हमसुन हमसुन रडायला लागली..

म्हणाली बलात्कारीतेला पुन्हा घरात आणणे सोपे नाही..
मी विसाउ शकेन इतके मोठे तुमचे कुणाचेच खोपे नाही..

मी सुन्न म्हणालो .."कुणी , कधी , कसे ,कुठे?"
.
.
तु अर्थ लावला तिथे, अन ’वाह’ घेतली जिथे..!!
विनायक

आत्मशोध ..४

स्वतंत्र 'मी' म्हणून जगायला ..
नक्की कधी सुरुवात केली?


अस्तित्वाची जाणीव नक्की कधी झाली ?
नाळ तुटली तेव्हा ?
अन ती नक्की कधी तुटली?
अन कशा कशाची ?
अस्तित्वासाठी आईशी ..
पहिल्यांदा खोटं बोललो ,तेव्हा सत्याशी ..
पहिल्या चोरट्या नजरेने बालपणाशी ..
पैशापायी गावाशी ..
ठरवून पाप करतना देवाशी ..


इतक्यांशी जुळलेली नाळ तुटली नेहमी ..
आता श्वासांशी असलेली नाळ तुटेल ..
तेव्हा विशेष वाटणार नाही माझे मलाच ..
अन तेव्हा नाळ जुळेल अवघ्या ब्रह्मांडाशी ,,,!!
मग इतके दिवस स्वतंत्र मी म्हणून जागून उपयोग काय ?


खरेच नाळ जुळली - तुटली नसती तर ..
आत्मशोध सुरूच नसता झाला...

विनायक

आत्मशोध ३

पुरुषत्वाची जाणीव नक्की कधी झाली ?
बाई सारखा काय रडतो विचारल्यावर ?
कि तिच्या कटाक्षाने अंगावर काटा आल्यावर ?
कि स्पर्शाने, अवयव भान आल्यावर ..
कि सारे अवयव बेभान झाल्यावर ?
कि बेभान पणाला आवर घातल्यावर ?
.
.
कुत्रा असल्याची जाणीव नक्की कधी झाली ?
कुणी कुत्रा म्हटलं म्हणून राग आल्यावर ?
कि माणसापेक्षा लाडाने पाळल्यावर?
कि पोट भरण्यासाठी कुत्तर-ओढ झाल्यावर ?
कि कुणाला कुत्र्या सारखं वागवल्यावर ..
कि शेपूट घालून गप्प बसल्यावर ?
.
.
मी पणाची जाणीव नक्की कधी झाली?
कुणी त्याच्यासारखं वाग म्हटल्यावर ?
कि त्याच्या सारखं जगत राहिल्यावर ..?
कि त्याच्यासारखं जमलं नाही तेव्हा ?
कि जगण्यात 'तो'च 'तो'च पणा आल्यावर ..?
कि सारं मीपण संपून गेल्यावर ?
.
.
.
विनायक

स्वप्नी दूर दिसावी कविता..

स्वप्नी दूर दिसावी कविता..
जाग येता उशाशी असावी कविता ..!

घोट भर कधी प्यावी कविता ..
अर्घ्य म्हणून द्यावी कविता ..!

गज-यात सखीच्या माळावी कविता ..
कज-यात तीच्या भाळावी कविता ..!

प्रेमात तीच्या सुचावी कविता..
प्रेमभंगात खरी कळावी कविता ..!

चंदनासम उगाळता झिजावी कविता ..
कस्तुरीसम न दिसता गंधावी कविता..!

जाता जाता बीजासम पेरावी कविता..
येताना फुलासम बहरावी कविता..!

अनंतीच्या प्रवासी निघावी कविता..
पोटी पुन्हा कुणाच्या अंकुरावी कविता..!!!

श्वास बनुनी हृदयी वसावी कविता..
प्राणवायू बनुनी शरीरी रुजावी कविता..!!

'मी' पणा बनुनी माजावी कविता..
नम्र राहुनी जगी गाजावी कविता..!!

पावसात अश्रूंच्या भिजावी कविता..
चांदण्यात सुखाच्या हसावी कविता..!!

मरता मरता अचानक जगावी कविता..
अन कुणाचे आयुष्यच व्हावी कविता..!!

आयुष्यगीत गाता समजावी कविता..
मरण सामोरे येता उमजावी कविता..!!
.
.
विनायक

आत्मशोध २नक्की कधी कळायला लागलं ..?
कि चोर - पोलीस खेळात ..
पोलिसच चोर असू शकतात !

अन कधी उमगलं आपल्याला,
कि बुद्धी वापरून झालं तर ठीक..
नाहीतर बळाचाच वापर जास्त करता येतो!

अन कधी कळलं  ?
कि आयुष्याच्या सापशिडी मध्ये ,
फासे आपल्या नाही,
नियतीच्याच हातात असतात!

अन पत्यात जसे हात ओढतात ,
तसे पाय ओढायचे असतात !

कधी कळलं  ?
कि लग्नात माणसाला माणूस नाही ,
जातीला जात लागते ,
संसाराला प्रेम नाही ,पैसा लागतो !
पोरांना बाप नाही ,संपत्ती लागते !

आत्मशोध घेताना याची उत्तर मिळावी ..
म्हणजे आत्म्याचा शोध संपूर्ण थांबेल ,
आणि आत्मशोध घेताना ..
माणुसकी सोडून आपण नक्की कधी 'असे' झालो ,
या उपप्रश्नांचे एक आवर्तन थांबेल ..
.
विनायक

आत्मशोध १

एकदा बाकीचे प्रश्न सोडून
एकच प्रश्न डोक्यात घेत..
कोऽहम कोऽहम करत..
खूप आत जावं..
तिथे आत्मशोध नावाच्या प्रकरणामध्ये ..
काही प्रश्न विचारावेत ...
निरागस हसणारा तू कुठे गेलास?
आणि काही उपप्रश्न हि विचारावेत ..
कि नक्की प्रश्न कशाचा आहे?
निरागसतेचा कि हास्याचा ?
आणि मग याचीहि खोटी उत्तरं देत ,
आत्मशोध संपूर्ण झाला ..
असा शेरा मारून ..
ते प्रकरण ..
कायमचे मिटवून टाकावे आपल्यापुरते ...
आणि एका नवी प्रकरणाला सुरुवात करावी..
विश्वशोध ..
कारण इथे खोटेपणा केल्यावर ..
तिथे कुणीच विचारत नाही खरी उत्तरं..!!
विनायक

राधेस ..अन कृष्णेस ..ही ..

जरी रुक्मिणी रोज शयनात आहे ..
तरी राधिका नित्य ह्रुदयात आहे..!!

जरी जाहली विद्ध निर्वस्त्र कृष्णे,
परी नागडा मीच पदरात आहे..!!

जरी त्यागली बासरी मीच राधे,,
सुरांचा वसा  खोल गगनात आहे,,!!

जरी संपली संतती आज कृष्णे,
तुझा वंश माझ्याच उदरात आहे..!!

न झाला जरी संग राधे तनांचा
खरे भेटणे आर्त विरहात आहे ..!!

जरी घेतली वाटुनी पूर्ण कृष्णे ..
तुझा मृत्यु अतृप्त जगण्यात आहे ..!!

विनायक
११-११-११

उत्तान कविता

आधी कविता लक्षात रहायची..एकदम बरोबर ठिकाणी सापडायची.. तीच्या बटांत मिळायची..तर कधी खळीत धडपडायची.. आधी कविता मानेला हिसका देउन मस्त ...