Saturday, May 19, 2012

शर


तुला माझ्या नावाने येतो काय गं अजुन ज्वर ..?
माझ्या नावचा तुला रुततो काय गं अजुन शर..?

तळ्याकाठचा नीरज फ़ुलतो काय गं ओंजळभर..?
लाजाळुसा लाजकाटा येतो काय ग देहभर..?

पहाटेचा केशरसडा घेतेस ना भरुन उरात..?
माझा स्पर्शाभास होतो काय गं अजुन फ़ुलात..?

दवभिजला मोगरा बहरतो का गं वेण्यात अजुन ..?
काजळचिंब पाउस पसरतो का डोळ्यात अजुन..?

मृगजळी होकाराची अजुन आहे थोडी आशा..
काष्ठरेघी नकाराची अजुन उतरत नाही नशा...

अजुन येत असेल ना आभाळहुंदका दाटुन मनात..?
अजुन घेत असशील ना पृथापदर ओढुन जनात..?

कुणी,कुठे,कसे,काय,कशाला,किती विचारु अजुन अजुन..?
वचन दे आता, स्वप्नदेशी या नाही येणार पुन्हा फ़िरुन..


विनायक
१/१/२०१२

अंदाज


मला आता कशाचाच अंदाज येत नाही ..
इतका घुसमटलो की माझाही मला आवाज येत नाही ..!!

किती प्रवास करतो थकतो  कितीकदा मी ,
तरी जो हवा मला तो गाव येत नाही ..

किती वेळा ठरवले विसरून जायचे तुला ..
तरी ओठावर  दुसरे नाव येत नाही ..

हात जोडतो किती प्रार्थना करतो बरी ,
तरी डोळ्यात अजून तो भाव येत नाही ..

मी उपचार अनेक केले, दाबले व्रण सारे ,,
आता कुणा समोर ही तू दिला घाव येत नाही ..

मी प्रयत्न केले खूप रक्त आटवले सारे ..
पण हृदये तोडण्याचा अजून सराव येत नाही ..

विनायक

कवितांची बंदुक


कवितांची बंदुक करावी ,

त्यात वेग वेगळ्या भावनांच्या कविता,
गोळ्या म्हणून भराव्या ,,
शरीरापेक्षा जास्त त्या मनाला भिडाव्या  ..

अन हवे तेव्हा हव्या तशा झाडाव्या..

एक गोळी झाडावी ,
हिच्या गोल गोब-या गालावर ..
खळीतुन घसरुन ती..
नथीत जाउन अडकावी..
आणि नथ उतरवुन ..
हिरव्या कच्च श्रुंगारात नहावी ..
त्यातुन मग वंशवेल बहरावी..

एक गोळी झाडावी तीच्या विरहाची
तीच्या  संसारावर..
तिला अन तीच्या नव-याला सात फ़ेरे घालुन..
तीच्या मंगळसुत्रात अडकावी..!
अन मग सात जन्म-बिन्म सारे हिशोब पुसावी !!


एक गोळी झाडावी..
आभाळातल्या कुणा विभुतीवर..
इथे त्याच्या नावे चाललेल्या विकृतीवर!!
त्या गोळीने मारुन टाकावीत बेगडी संस्करणे
पिढ्यांपिढ्या चालत आलेली ..!!
अन पिढि दर पिढि वाढत आलेली..!

एक गोळी झाडावी..
जुन्या सा-या आपल्याच कवितांवर..
टुकार शब्दांचे चुकार प्रयोग पुसावेत तिने,
अन त्यांचे भिकार प्रदर्शनहि...
अन खरेतर त्या प्रदर्शनाचे समर्थनहि..!

एक ’कविता’ झाडावी..
अशीच मुक्त ..
तिला कशाचे बंधन नसावे..
नसावी तीच्यात मांडणी,
अन नसावी कुठलीच धाटणी....
मुक्त एकदम मुक्त ..!
अन तिनेच फ़ीरुन येउन,
डोक्यात जाउन आपल्याच ,
जीव घ्यावा एकदाचा..!

विनायक

प्रलयगीत

 दिवस मोगरा होतो  रात्र सायली होते ,  तुझिया अस्तित्वाने  श्लोक-शायरी होते।  मी धुनी पेटवत असता तू यज्ञाचे मंतर गाते , मी अलख निरंजन म्हणतो ...