Saturday, May 19, 2012

कवितांची बंदुक


कवितांची बंदुक करावी ,

त्यात वेग वेगळ्या भावनांच्या कविता,
गोळ्या म्हणून भराव्या ,,
शरीरापेक्षा जास्त त्या मनाला भिडाव्या  ..

अन हवे तेव्हा हव्या तशा झाडाव्या..

एक गोळी झाडावी ,
हिच्या गोल गोब-या गालावर ..
खळीतुन घसरुन ती..
नथीत जाउन अडकावी..
आणि नथ उतरवुन ..
हिरव्या कच्च श्रुंगारात नहावी ..
त्यातुन मग वंशवेल बहरावी..

एक गोळी झाडावी तीच्या विरहाची
तीच्या  संसारावर..
तिला अन तीच्या नव-याला सात फ़ेरे घालुन..
तीच्या मंगळसुत्रात अडकावी..!
अन मग सात जन्म-बिन्म सारे हिशोब पुसावी !!


एक गोळी झाडावी..
आभाळातल्या कुणा विभुतीवर..
इथे त्याच्या नावे चाललेल्या विकृतीवर!!
त्या गोळीने मारुन टाकावीत बेगडी संस्करणे
पिढ्यांपिढ्या चालत आलेली ..!!
अन पिढि दर पिढि वाढत आलेली..!

एक गोळी झाडावी..
जुन्या सा-या आपल्याच कवितांवर..
टुकार शब्दांचे चुकार प्रयोग पुसावेत तिने,
अन त्यांचे भिकार प्रदर्शनहि...
अन खरेतर त्या प्रदर्शनाचे समर्थनहि..!

एक ’कविता’ झाडावी..
अशीच मुक्त ..
तिला कशाचे बंधन नसावे..
नसावी तीच्यात मांडणी,
अन नसावी कुठलीच धाटणी....
मुक्त एकदम मुक्त ..!
अन तिनेच फ़ीरुन येउन,
डोक्यात जाउन आपल्याच ,
जीव घ्यावा एकदाचा..!

विनायक

No comments:

Post a Comment

प्रलयगीत

 दिवस मोगरा होतो  रात्र सायली होते ,  तुझिया अस्तित्वाने  श्लोक-शायरी होते।  मी धुनी पेटवत असता तू यज्ञाचे मंतर गाते , मी अलख निरंजन म्हणतो ...