Wednesday, July 24, 2013

संभवामी युगे युगे ..!


खरं सांगायंच तर,
मला राधेच्या हाती द्यायची होती बासरी,
पण तिला कृष्ण हवा होता,
मी तिला देह देणार होतो ,
पण तिला गुण हवा होता ,
मी धर्म देणार होतो,
तर तिनं प्रेमालाच धर्म बनवलं,

आणि तसं खरं सांगायच तर ..
मला सुदाम्याला द्यायचे होते पोहे ..
अगदी स्वत: करुन
पण सुदाम्याला मी हवा होतो ..
मी त्याला किर्ती देणार होतो ..
त्याला मैत्री हवी होती ..
आणि त्यानं मैत्रीला किर्ती मिळवुन दिली ..

आणि खरं सांगायंच तर,
मला करायचे होते अनेक प्रयोग ,
मी माणुस बनवला,
त्याला लढायंच शिकवलं,
विजीगिषु बनवंल ,
आणि मी पहात राहीलो त्याचा लढा ,
मी सृष्टी पाण्यात बुडवली,
तर त्याने जलचराशी केली जवळीक
जगला, वाचला अन पुन्हा
मला "देव" करुन काढली माझीच आगळीक ..

आणि अगदी खरं सांगायंचे तर ,
मला पुन्हा पुन्हा नको होता जन्म ..
मला मोक्ष घेऊन सांगायचे होते मर्म ..
मला गीतेत मोक्षाचा धर्म सांगायचा होता ,

मग मी कर्माला मोक्ष बनवला ,
"कर्मण्येवाधिकारस्ते  " म्हणत
आणि येत राहीलो पुन्हा पुन्हा
"संभवामी युगे युगे " म्हणत  ..!!

विनायक
२४ जुलै २०१३

Wednesday, July 10, 2013

नको मला पाउस वेडा ..

नको मला पाउस वेडा ..
नको त्याचा वेडा नाच ..
त्याच्या सोबत येणार होतीस ..
ते तेवढं या डोळ्यात वाच ..

तो नेहमी शब्द बदलतो..
तू दिल्या शब्दाला जाग ..
पाउस बिउस झूठ साला ..
तू तरी खरं वाग..

सोड सारी जग रहाटी..
सोडुन दे हे सारं जग..
तुझ्या कटीचा पदर ओला..
हात माझा सावरेल बघ..

तु मिठीत येता सखी ..
मेघ सुद्धा जळेल बघ..
नक्कि बरसेल मग तो..
विझवण्या ही मिलनधग..

विनायक
१० जुलै २०१३

Friday, July 5, 2013

पाऊस तिचा त्याचा !!

एक सांगू..?

या वेळी पावसाने कस्स बरसायला हवं?

रिम झिम रिम झिम..
रात्र न दिवस ..
अन झिरपून अंग प्रत्यांगात हळू हळू ..

ठिसूळ करायला हवं सारं ,
तन, मन, बुद्धी ,विचार ..
अन उचकटून सगळ ..
विस्कटून टाकायला हवं ..

तुझ्याशिवाय पुन्हा सुरुवात करायची म्हणता 
इतकं तरी व्हायला हवं ..!
इतकं तरी व्हायला हवं ..!!
.
.
.
पुन्हा सांगू ..?

पावसाने कस बरसायला हवं ?

जोरदार !!
एकाच दिवसात ,
भेटून अवचित रस्त्यात ,
एकटा गाठून..

सोबत कुणी नाही याची जाणीव देऊन ..
तू जिथे असतेस तिथे कळ देऊन ..
उन्मळून पाडायला हवं ..

तू नसताना पाउस आल्यावर 
इतकं तरी व्हायला हवं ..!
इतकं तरी व्हायला हवं ..!!
.
.
.
खरं सांगू का ?

पावसाने या वेळी बरसायलाच नको..
भलं-बुरं,नवं-जुनं 
तसंच आत जपून ..
कुणा कुणाला हे सगळं दाखवायलाच नको..

आता कुठला विस्कटतो अन उन्मळतो मी 
हे त्याला कळायला हवं ..

एकतर 
त्याने गप गुमान डोळे मिटून 
माझ्या घरावरून निघायला हवं ..

नाहीतर 
तू ठरवून दिल्याप्रमाणं त्याला मी ,
तू नसताना टाळायला हवं .. !!

इतकं तरी व्हायला हवं ..!
इतकं तरी व्हायला हवं ..!!

विनायक 

कमीनी कौम

देवा, डॅडु कसे आहेत रे आता देवाआनंद बरोबर बसले असतील न हसत ? किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत ? आठवत का देवा तुला किती उपास तपास ...