Tuesday, December 12, 2017

गोष्ट असेल छोटीशी ..

गोष्ट असेल छोटीशी ..
पण त्याचीही कथा करतील..
तु सुस्कारे सोडशील साधे..
लोक त्याचीही गाथा करतील ..१

शिस्तभंगाचे कलम
लागेल तुझ्या बटांना ...
कारणे दाखवा नोटीस..
देतील तुझ्या व्यथांना २

तुझ्या हातांची थरतर..
लोक चवीने चघळतील ..
हातांच्या सुरुकुत्याही मग
खपली सारख्या उसवतील..३

हे बसलेच असतील..
सरल्या वर्षांचे अंतर टपण्या..
हीरव्या चुड्यावर ही
करतील बिलंदर टीप्पण्ण्या..४

लोकांची  जात  आहे ,
लावतील जीभ टाळ्याला..
सीतेने किती सोसले
कधी कळलं धोब्याला ?५

तू कपाळी नको दाखवू ..
एक सुद्धा आठी ..
लोक त्या रेषांतून सुद्धा
मोजतील आपल्या भेटी ..६

एक एका प्रश्नांनी
उसवतील अनेक गाठी..
गोष्ट माझीच असेल ..
पण तू नको आणुस ओठी..७

गोष्ट असेल छोटीशी ..
पण त्याचीही कथा करतील..
तु सुस्कारे सोडशील साधे..
लोक त्याचीही गाथा करतील ..

विनायक
२८/१२/११

Wednesday, December 6, 2017

प्रार्थना , हे कविता माये !

हे कविता माये ,

सगळ्यांचे भले कर..!
इथे खुपजण पोटुशी आहेत ....
त्यांचे भले कर...!

कुणाच्या पोटी प्रश्न दे..
तर दुसऱ्या पोटी उत्तर दे..!
तिसऱ्याला ते चुकीचे ठरवू दे!!
चौथ्या पोटी हे सगळे पटवून दे ..!
कुणी राग नावाच्या पोराला जन्म दिला
तर दुसऱ्या पोटी शांती नावाची पोरगी दे..!

इथे खुपजण लग्नाळु आहेत ..
सदाहास नावाच्या सगळ्या पोरांना ...
करुणा नावाच्या पोरींची ओळख करुन दे...!
सगळ्याना थोडं  थोडं  तोलून दे..
जमलंच  तर एकमेकात माळून दे..!

इथे काहीजण स्वप्नाळू  आहेत ..
काहींची स्वप्न लवकर पूर्ण कर..
काहींची मोठी करत.. अपूर्ण ठेव..
निराश लोकाना त्यांना भेटव..!
यांची निराशा लवकर संपव ...!

इथे खुपजण धर्मांध आहेत ..
त्यांना डोळस कर ....
'तो' नेहमीच तुमच्यासाठी लढायला येतो म्हणावे ..
तुम्ही 'त्याच्यासाठी' लढु नका म्हणावे ...!
इथे खुपजण ओळख हरवले आहेत ..
आपोआप चांगदेव झाले आहेत..!
तू कुणाला तरी मुक्ताई बनव..
तिच्या हातून पासष्टी लिहून दाखव ..

इथे खुपजण काव्याळु आहेत ..
त्यांच्या कविता लवकर कागदावर उतरवून घे ..
त्या  सगळयांना कळु दे..
अर्थ त्यांचे थोड़े फार तरी वळु दे..!!
मनातलं  सगळे तुझ्या रुपाने उतरु दे..!
सगळे सगळे तुझ्या रुपात सामव..
अन खुप सारे विषय अजुन..
असे थोडक्यातच संपव..!!!!!

विनायक

Thursday, November 23, 2017

मौन राग

तुझ्या मौन रागात
युगांच्या कथा
तुझी फकीरी
लाख मोलाची सख्या ,
माझ्या नशिबी
सुबत्तेच्या व्यथा . . !!

नक्षत्र पावसाळी
तुझ्या ओठी वसते
इथे दुष्काळ असा की
फक्त पाणी म्हणण्या
ओठां मिठी बसते.. !!

तुझ्या रौद्रभाळी
पिढ्यांची चिंता
आहे भाग्यकरंटे
कपाळ माझे
हात जोडोनी म्हणतो
पाहील नियंता

तु तस्बीरीतुनी जेव्हा
 जगी नित्य पाहतो,
तू अव्हेरले ज्याला
त्याचे मंदिर झाले ,
तुझ्या गाली बुद्ध
मिश्किल हसतो !!

समजली राधा की
मनुष्य कृष्ण  होतो,
पण अनय होणे जमले की,
कृष्ण खरा मुक्त होतो !!!

#Vinayaki

Thursday, June 22, 2017

उत्तान कविता

आधी कविता लक्षात रहायची..एकदम बरोबर ठिकाणी सापडायची..
तीच्या बटांत मिळायची..तर कधी खळीत धडपडायची..

आधी कविता मानेला हिसका देउन मस्त मुरका मारायची..
गुलाबी थंडीच्या सिगारेटचा खोटा झुरका माराय़ची ..

माझ्याकडे आली की भुकेल्या नजरेने बघायची..
अन जाताना मलाच नव्या ओळी भरवायची..

मी गेलो तीच्याकडे की हसत स्वागत करायची ..
मला परत पाठवताना,नवी उर्मी उरात भरायची..

मधल्या कित्येक दीवसात मी भेटुच शकलो नाही..
मी दार ठोठावले अनेकदा पण तीला गाठुच शकलो नाही..

अचानक कुणी म्हणाले फ़ीरते आहे ती वेड्यासारखी बाजारात..
मी धावत गेलो तिच्याकडे ,शाल पांघरुन आणले घरात..

घरी येताच हसली कशी-बशी..आणि बिलगली एकदम उराशी..
पुन्हा हसली शाल-बिल सोडुन..अन शब्द शब्द तीचा उठला पेटुन..

मला एकदम जाणवलं..मगाशी हीने हासुन मला हीणवलं..
माझ्या प्रगल्भतेला मुळापसुन हलवंल..

कविता आता उत्तान झाली ..
वणव्याने पेटलेलं तुफ़ान झाली ..

जी कविता जायची डोक्यात , ती कविता आता जाते देहात ...
हात फ़ीरवता पाठीवरती , मुके घेते छातीवरती...

मधुनच उगाच रुसुन बसते, आकाशाकडे पहाते मग्न होऊन..
ओळी सा-या नीरेसारख्या सोडुन बघत रहाते, नग्न होऊन...

मला म्हणाली या कानामागुन त्या कानामागे नख लाव..
शब्दनखांनी तुझ्या लालेलाल होयीन अशी धग लाव..

म्हणालो बये बये तुला झालंय काय?तु होतीस बरी संस्कारी..
पुन्हा पदर ढाळुन म्हणाली, हीच खरी अदाकारी..

एका मध्यरात्री उठलो मी चवताळुन..विचारले तीला घालुन पाडुन..
पुन्हा तशीच हसली स्वत:शी ,अन झोपी गेली तोंड लपवुन..

पहाटे पर्यंत मी तीच्या अनावृत्त देहाकडे अनिमिष पहात होतो..
अलंकार,भरजरी शब्द,वृत्त,मात्रा,पुन्हा द्यायचा विचार करत होतो..

जाग आली सकाळी..म्हणजे माझा डोळा लागला..
हात फ़ीरवता बिछान्यावरती..एक कागदाचा बोळा लागला..

तीने माझे विचार वाचले होते , पुन्हा तीच्यावर बंधन घालायचे..
लिहीले होते पुढे ..की तिला आता पुर्ण मुंडन करायचे..

ती विद्रुप चेह-याने चिटो-यातुन त्या बोलायला लागली..
बोलायला कसली हमसुन हमसुन रडायला लागली..

म्हणाली बलात्कारीतेला पुन्हा घरात आणणे सोपे नाही..
मी विसाउ शकेन इतके मोठे तुमचे कुणाचेच खोपे नाही..

मी सुन्न म्हणालो .."कुणी , कधी , कसे ,कुठे?"
.
.
तु अर्थ लावला तिथे, अन ’वाह’ घेतली जिथे..!!
विनायक

आत्मशोध ..४

स्वतंत्र 'मी' म्हणून जगायला ..
नक्की कधी सुरुवात केली?


अस्तित्वाची जाणीव नक्की कधी झाली ?
नाळ तुटली तेव्हा ?
अन ती नक्की कधी तुटली?
अन कशा कशाची ?
अस्तित्वासाठी आईशी ..
पहिल्यांदा खोटं बोललो ,तेव्हा सत्याशी ..
पहिल्या चोरट्या नजरेने बालपणाशी ..
पैशापायी गावाशी ..
ठरवून पाप करतना देवाशी ..


इतक्यांशी जुळलेली नाळ तुटली नेहमी ..
आता श्वासांशी असलेली नाळ तुटेल ..
तेव्हा विशेष वाटणार नाही माझे मलाच ..
अन तेव्हा नाळ जुळेल अवघ्या ब्रह्मांडाशी ,,,!!
मग इतके दिवस स्वतंत्र मी म्हणून जागून उपयोग काय ?


खरेच नाळ जुळली - तुटली नसती तर ..
आत्मशोध सुरूच नसता झाला...

विनायक

आत्मशोध ३

पुरुषत्वाची जाणीव नक्की कधी झाली ?
बाई सारखा काय रडतो विचारल्यावर ?
कि तिच्या कटाक्षाने अंगावर काटा आल्यावर ?
कि स्पर्शाने, अवयव भान आल्यावर ..
कि सारे अवयव बेभान झाल्यावर ?
कि बेभान पणाला आवर घातल्यावर ?
.
.
कुत्रा असल्याची जाणीव नक्की कधी झाली ?
कुणी कुत्रा म्हटलं म्हणून राग आल्यावर ?
कि माणसापेक्षा लाडाने पाळल्यावर?
कि पोट भरण्यासाठी कुत्तर-ओढ झाल्यावर ?
कि कुणाला कुत्र्या सारखं वागवल्यावर ..
कि शेपूट घालून गप्प बसल्यावर ?
.
.
मी पणाची जाणीव नक्की कधी झाली?
कुणी त्याच्यासारखं वाग म्हटल्यावर ?
कि त्याच्या सारखं जगत राहिल्यावर ..?
कि त्याच्यासारखं जमलं नाही तेव्हा ?
कि जगण्यात 'तो'च 'तो'च पणा आल्यावर ..?
कि सारं मीपण संपून गेल्यावर ?
.
.
.
विनायक

स्वप्नी दूर दिसावी कविता..

स्वप्नी दूर दिसावी कविता..
जाग येता उशाशी असावी कविता ..!

घोट भर कधी प्यावी कविता ..
अर्घ्य म्हणून द्यावी कविता ..!

गज-यात सखीच्या माळावी कविता ..
कज-यात तीच्या भाळावी कविता ..!

प्रेमात तीच्या सुचावी कविता..
प्रेमभंगात खरी कळावी कविता ..!

चंदनासम उगाळता झिजावी कविता ..
कस्तुरीसम न दिसता गंधावी कविता..!

जाता जाता बीजासम पेरावी कविता..
येताना फुलासम बहरावी कविता..!

अनंतीच्या प्रवासी निघावी कविता..
पोटी पुन्हा कुणाच्या अंकुरावी कविता..!!!

श्वास बनुनी हृदयी वसावी कविता..
प्राणवायू बनुनी शरीरी रुजावी कविता..!!

'मी' पणा बनुनी माजावी कविता..
नम्र राहुनी जगी गाजावी कविता..!!

पावसात अश्रूंच्या भिजावी कविता..
चांदण्यात सुखाच्या हसावी कविता..!!

मरता मरता अचानक जगावी कविता..
अन कुणाचे आयुष्यच व्हावी कविता..!!

आयुष्यगीत गाता समजावी कविता..
मरण सामोरे येता उमजावी कविता..!!
.
.
विनायक

आत्मशोध २नक्की कधी कळायला लागलं ..?
कि चोर - पोलीस खेळात ..
पोलिसच चोर असू शकतात !

अन कधी उमगलं आपल्याला,
कि बुद्धी वापरून झालं तर ठीक..
नाहीतर बळाचाच वापर जास्त करता येतो!

अन कधी कळलं  ?
कि आयुष्याच्या सापशिडी मध्ये ,
फासे आपल्या नाही,
नियतीच्याच हातात असतात!

अन पत्यात जसे हात ओढतात ,
तसे पाय ओढायचे असतात !

कधी कळलं  ?
कि लग्नात माणसाला माणूस नाही ,
जातीला जात लागते ,
संसाराला प्रेम नाही ,पैसा लागतो !
पोरांना बाप नाही ,संपत्ती लागते !

आत्मशोध घेताना याची उत्तर मिळावी ..
म्हणजे आत्म्याचा शोध संपूर्ण थांबेल ,
आणि आत्मशोध घेताना ..
माणुसकी सोडून आपण नक्की कधी 'असे' झालो ,
या उपप्रश्नांचे एक आवर्तन थांबेल ..
.
विनायक

आत्मशोध १

एकदा बाकीचे प्रश्न सोडून
एकच प्रश्न डोक्यात घेत..
कोऽहम कोऽहम करत..
खूप आत जावं..
तिथे आत्मशोध नावाच्या प्रकरणामध्ये ..
काही प्रश्न विचारावेत ...
निरागस हसणारा तू कुठे गेलास?
आणि काही उपप्रश्न हि विचारावेत ..
कि नक्की प्रश्न कशाचा आहे?
निरागसतेचा कि हास्याचा ?
आणि मग याचीहि खोटी उत्तरं देत ,
आत्मशोध संपूर्ण झाला ..
असा शेरा मारून ..
ते प्रकरण ..
कायमचे मिटवून टाकावे आपल्यापुरते ...
आणि एका नवी प्रकरणाला सुरुवात करावी..
विश्वशोध ..
कारण इथे खोटेपणा केल्यावर ..
तिथे कुणीच विचारत नाही खरी उत्तरं..!!
विनायक

राधेस ..अन कृष्णेस ..ही ..

जरी रुक्मिणी रोज शयनात आहे ..
तरी राधिका नित्य ह्रुदयात आहे..!!

जरी जाहली विद्ध निर्वस्त्र कृष्णे,
परी नागडा मीच पदरात आहे..!!

जरी त्यागली बासरी मीच राधे,,
सुरांचा वसा  खोल गगनात आहे,,!!

जरी संपली संतती आज कृष्णे,
तुझा वंश माझ्याच उदरात आहे..!!

न झाला जरी संग राधे तनांचा
खरे भेटणे आर्त विरहात आहे ..!!

जरी घेतली वाटुनी पूर्ण कृष्णे ..
तुझा मृत्यु अतृप्त जगण्यात आहे ..!!

विनायक
११-११-११

Soulmate

तो म्हणाला photo पहिले तुझे ,
छान हसतेस ..
मी पुन्हा तशीच हसले ..
म्हणाला तुझा ड्रेस ही छान होता ..
मी म्हणाले "धन्यवाद !"
म्हणाला ,हे नेहमीचे आहे
की त्या फोटोत काही विशेष ?
मला कळलेच नाही ...
त्याने पुन्हा विचारले ,
तू नेहमीच इतकी जवळ असतेस त्याच्या ?
आणि इतकी हसतेस ?
मग माझ्या डोक्यात प्रकाश..
(अन भविष्यात अंधार !!)
मी म्हणाले ,
तू तितक्या जवळ आलास की कळेल ,
.
.
.
.
(मागे चिमटा काढला की असंच हसू येतं ).
.
विनायक

रेषा

माझ्या तळहातावर एक डाग आहे कसलासा ..
तो नेमका आयुष्य रेषेवर आहे म्हणे ..

"आधी नव्हता" असे आई म्हणाली ..
तिला कळतं त्यातलं !! ती वाचते हात !
अन त्या दिवशी तिच्या कपाळावरची आठी मी वाचली !!
तुझ्या ओठांवर ..
त्या खालच्या ओठाखाली डाव्या बाजूला ..
जिथे तू ओठ  चावते नेहमी तिथे एक तीळ आहे ..!!
पहिल्या भेटीत दिसला च नव्हता ..
पण तू जेव्हा लाजते अन ओठ चावते ..
तेव्हा अचानक उगवतो तो ..!

तुला आठवतं ?
आपल्या शेवटच्या भेटीत काही न बोलता
मी तुझा चेहरा किती वेळ ओंजळी मध्ये धरला होता ?
इतका वेळ, कि निघताना
माझ्या तळहाताची अंत:करण रेषा..ठसठशीत उमटली
तुझ्या गालावर !!

काल तुझा नवरा भेटला होता
अस्वस्थ ,सैर-भैर काही शोधत होता ..!
कपाळावर आठी होती,
का कुणास ठाऊक ..
का कुणास ठाऊक?
मला ती आठी ओळखीची वाटली ..
खरं तर त्या आठी ने ओळख दिली त्याची ..
त्याच्या नशीब रेषेवर डाग आहे म्हणे !!


विनायक

आसवे

जाळते हुंकार झाली आसवे ..
जाळण्या तैयार झाली आसवे ..

हासण्या सोकावली कैफात ती ..
पापण्यांना भार झाली आसवे..

वाटले राहीन शृंगारा विना ..
मोजका शृंगार झाली आसवे ..

राहता ती याद थोडी वेदना ..
मोजताना फार झाली आसवे ..

लाजता काव्यास माझ्या हासता ..
गाजता चीत्कार झाली आसवे ..

योजनेला अंत येऊ पाहता ..
शेवटी आभार झाली आसवे ..

#Vinayaki

कौमार्यभंग

कौमार्यभंगासाठी ..
मी जागेच्या शोधात असता,

काल अथांग समुद्र पहिला ..
आणि विचार केला ,
जाऊत त्या बेटांवर ..
जिथे लाटा तयार होतात ..!

तिथे..
जिथे पालवी ऋतुस्नात झाली नसेल अजून ..!
आणि फुलांचा गंधही ,
स्पर्शला नसेल कोणी ..!
तिथल्या जमिनीचेही पावित्र्य ,
शाबूत असेल असून ..!

तिथल्या वा-याला ,
शरीर ही संकल्पना नवीन असेल ..!
जिथे चंद्र उत्तरेला उगवतो ,
अन सूर्य दक्षिणेला मावळतो ..!
अन मला अचानक जाणवले ,

कौमार्यभंग तर कधीचा झाला आहे !!!!!
जेव्हा माझी पहिली कविता वाचली  तुम्ही..!

.
.
_विनायक

माझ्या मुला , तु राजकुमार नको बनुस ..

माझ्या मुला ,
तु राजकुमार नको बनुस ..
कारण मग राजकुमारी लागते ..
आता तुला डोंबारीण आवडु शकत नाही..
बरे तु स्वत: राजकुमारी निवडु शकत नाही..
कारण पुन्हा निवडलेली राजकुमारी जातीची लागते ..
तु जळणा-या रुपाचा असला ,तर ती तुपाच्या वातीची लागते..
कारण... तेलाचं तुपाला लाउ नये ..
अन बुद्धीचं माप रुपाला लाउ नये ..
बरं आता त्या राजकुमारीला राणी व्हावं लागतं,
तु लढाईवर गेला कि तिला कुढावं लागतं..
बरं डोंबारणीला कुढता येत नाही ,,
कारण.... तिला उडता येतं!!
पण तुला उडणारी नाही कुढणारी निवडावी लागते..
कारण विसरलास का ?शेवटी ती राजकुमारी असते!!
म्हणुन म्हणतो राजकुमार बनु नकोस !!
बरं आता तु राजकुमार झाला ,
तर उद्या तुला राजा व्हावं लागणार..!
तुला जनतेपायी युद्धा-बिद्धा वर जावं लागणार ..अन पुन्हा राणीला रडवावं लागणार ..
जनतेतलं आपल्या कुलाच्या विश्वासाचं रोप, तीच्या अश्रुंनी वाढवावं लागणार !!

बरं ,आयुष्यात शेवटी तुला आत्मचरित्र लिहिता नाही येणार..
कारण ते लिहुन तु ते मांडलं,
हे सगळं लेखणीतून सांडलं ,
तर लोक भरल्या पोटाचं दुखणं बोचतं म्हणणार ..
आणि सुखभरल्या गादीवर फ़ुलपण टोचतं म्हणणारं..
आत्मचरित्राला उद्या पुरस्कार मिळाला तर ”पैशांनी विकत म्हणणार .”.
अणि जास्त खपलं तर, ”राजा आहे, देईलही फ़ुकट म्हणणार ..”

पण हे सगळं तुला न लिहुन सांगावं लागणार आहे ..
तुझ्या डोळ्यातल्या पाण्याला थांबवावं लागणार आहे..

आणि लिहिलंच चुकुन तु हे सारं,
तर त्याला "चरित्र" म्हणता येणार नाही..
कारण...
विसरलास का ?
तुला डोंबारीण आवडली होती..
तिच्या सोबत उडताना तुला पकडंलंय वा-यानी..
आणि त्याचा निर्णय करायचा आहे सा-यांनी ..
विनायक

माझिया गल्बता तू खलाशी !

गझलियत गवसते थोर खाशी ,
ठेच सानीत जेव्हा तळाशी !

झेप मी घेतली उंच गगनी
जोडता नाळ माझी तुझ्याशी !

प्रश्न नाही कुणाचा मनाशी
उत्तराची अपेक्षा जनाशी ..!

मागणे हेच आता कृपाळा
बोलणे होऊ दे अंतराशी ..!

थंड रक्तास ऐकव विनायक ,
षंढ नाते तुझे 'निर्भया'शी !

घोर माझ्या शिडाला कशाचा ?
माझिया गल्बता तू खलाशी !


विनायक

आमची 'ती'.....माझी 'हि'.....आणि 'मी'......!!

'ती'
घाबरून ससा झालेली ..
काही क्षणापूर्वी मोर होती ..
"कसले कपडे घातलेस..?
सारे संस्कार कुठे विकलेस?
वाटलं असेल?,बाप काही बोलत नाही ..
म्हणजे असं नाही कि त्याला काही दिसत नाही..!!"

'हि'
तितकीच थंड..
तिला कुशीत घेऊन गेली..
अन थोड्या वेळाने 'ती'
कबुतर होऊन फुर्र होऊन गेली..

'मी'
जाम भडकलेला..
आधी तिच्यावर अन आता हिच्यावर..
"तुला कळतंय का काही..?
मला काही किंमत आहे कि नाही..?
का सोडलं तिला तसं?"

हि:
"बाप म्हणून विचारतोयस कि पुरुष म्हणून ..?"
मी एकदम गार..
अन म्हणालो , "घरात बाप असलो तरी ..
बाहेरच्या पुरुषांच्या नजरा कळतात.."

हि:
"मला नाही कळत..?"
मी " ' ' "
क्रमश:

कवितेचं कोर्ट!

एकदा कुणीतरी कानात काही भरवलं.
आणि कवितांनी कवीला कोर्टात न्यायचं ठरवलं !

न्यायालयात जायचं पण न्यायाधीश कोण होणार?
तुझं कवीमन सच्चं अन् खरं, तेच न्याय देणार !

कोर्टामध्ये जेव्हा सुनावणी झाली सुरु ..
मूक माझ्या कविता एक एक, बोलल्या चुरुचुरु..!!

एक कविता उठली, म्हणाली, “तू अवकाळी बोलावतोस वरुण
आणि वठलेल्या खोडांना करतोस, रसरशीत शब्दांनी तरुण!”

“तू करतोस चोळामोळा, फाडतोस कधी कधी मला”, हा एक आरोप..
माझ्या अर्धवट रहाण्याने घुसमटले आहेत ’तिचे’ सारे निरोप ..!!

“तू रचतोस माझ्याआडुन दु:खभारल्या ओळी..
अन विकुन बाजारात वसुल करतोस टाळी ..!!”

“दोन दोन ओळींत शेर लिहुन दर्द देतो तिला ..
गझल गझल म्हणत बिलगुन बसतोस जिला !!”

“तू कधीही खोडतोस कधी मला, अन विसरुन जातोस पुन्हा.
माझ्या माथी ओरबडल्याचे व्रण, अन अपुर्णतेचा गुन्हा !!”

मी मनातुन हसत होतो पाहुन त्यांचा अभिनिवेश ..
हसू आलं पाहुन स्वत:च्या ओळींचा परकाया प्रवेश !!

ते पाहुन कविता म्हणाली तुला द्यायला हवी शिक्षा कठोर ..
मी सुचू नये तुला बिल्कुल तू झाला आहेस मुजोर .. !!

त्या दिवसांपासून मित्रहो, ओळी, शब्द, अर्थ घेउन फिरतो आहे..
कविता भेटेल कुठेतरी या आशेत झुरतो आहे . .!

विनायक उजळंबे 

Friday, March 17, 2017

The Signature Day !!


आज कॉलेजात सिग्नेचर डे होता !!

काही जण हातावर सह्या करत होते ,
काही जण गालावर ,
काही तळहातावर ,
तर काही अवलीये बेफिकरे
सह्या अक्षरश: मानेवर करत होते
आणि करून घेत होते !!


स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स!!

मग तू आलीस ,
तेव्हा वाटलं आपणही करावी एक सही..

खुप आधी कधीतरी ,
तू मला म्हणाली पण होतीस ,
"तुझी सही अगदी हटके आहे "!
मला माझ्या सहीसाठी तशीच जागा हवी होती ,
हटके ,अगदी हटके !!

किंबहुना intimate च !!

मग त्या एका क्षणात ,
मन तुझ्या देहभर फिरुन आलं !

पण हवी ती जागा मिळाली नाही !
आणि मग तू जेव्हा माझ्याकडे पाहीलं

तेव्हा लक्षात आलं,
तुझ्या गहि-या डोळ्यांच्या डोहामध्ये
फक्त मला पाहताना जे तरंग उमटतात ,
त्या तरंगाची नियमित होणारी आवर्तने
जशा त-हेने माझ्याकडे पाहतना अनियिमित होतात ,

ती तरंग ओली ,
थोडी भिजली,
माझ्यासाठीच सजली ......"आवर्तने "

म्हणजेच माझी intimate signature आहे!!
विनायक!
९ मार्च २०१७
(#theUltimateInitmateSignatureDay !!)

कमीनी कौम

देवा, डॅडु कसे आहेत रे आता देवाआनंद बरोबर बसले असतील न हसत ? किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत ? आठवत का देवा तुला किती उपास तपास ...