Thursday, June 22, 2017

रेषा

माझ्या तळहातावर एक डाग आहे कसलासा ..
तो नेमका आयुष्य रेषेवर आहे म्हणे ..

"आधी नव्हता" असे आई म्हणाली ..
तिला कळतं त्यातलं !! ती वाचते हात !
अन त्या दिवशी तिच्या कपाळावरची आठी मी वाचली !!
तुझ्या ओठांवर ..
त्या खालच्या ओठाखाली डाव्या बाजूला ..
जिथे तू ओठ  चावते नेहमी तिथे एक तीळ आहे ..!!
पहिल्या भेटीत दिसला च नव्हता ..
पण तू जेव्हा लाजते अन ओठ चावते ..
तेव्हा अचानक उगवतो तो ..!

तुला आठवतं ?
आपल्या शेवटच्या भेटीत काही न बोलता
मी तुझा चेहरा किती वेळ ओंजळी मध्ये धरला होता ?
इतका वेळ, कि निघताना
माझ्या तळहाताची अंत:करण रेषा..ठसठशीत उमटली
तुझ्या गालावर !!

काल तुझा नवरा भेटला होता
अस्वस्थ ,सैर-भैर काही शोधत होता ..!
कपाळावर आठी होती,
का कुणास ठाऊक ..
का कुणास ठाऊक?
मला ती आठी ओळखीची वाटली ..
खरं तर त्या आठी ने ओळख दिली त्याची ..
त्याच्या नशीब रेषेवर डाग आहे म्हणे !!


विनायक

No comments:

Post a Comment

गोष्ट असेल छोटीशी ..

गोष्ट असेल छोटीशी .. पण त्याचीही कथा करतील.. तु सुस्कारे सोडशील साधे.. लोक त्याचीही गाथा करतील ..१ शिस्तभंगाचे कलम लागेल तुझ्या बटांना ......