Thursday, June 22, 2017

कवितेचं कोर्ट!

एकदा कुणीतरी कानात काही भरवलं.
आणि कवितांनी कवीला कोर्टात न्यायचं ठरवलं !

न्यायालयात जायचं पण न्यायाधीश कोण होणार?
तुझं कवीमन सच्चं अन् खरं, तेच न्याय देणार !

कोर्टामध्ये जेव्हा सुनावणी झाली सुरु ..
मूक माझ्या कविता एक एक, बोलल्या चुरुचुरु..!!

एक कविता उठली, म्हणाली, “तू अवकाळी बोलावतोस वरुण
आणि वठलेल्या खोडांना करतोस, रसरशीत शब्दांनी तरुण!”

“तू करतोस चोळामोळा, फाडतोस कधी कधी मला”, हा एक आरोप..
माझ्या अर्धवट रहाण्याने घुसमटले आहेत ’तिचे’ सारे निरोप ..!!

“तू रचतोस माझ्याआडुन दु:खभारल्या ओळी..
अन विकुन बाजारात वसुल करतोस टाळी ..!!”

“दोन दोन ओळींत शेर लिहुन दर्द देतो तिला ..
गझल गझल म्हणत बिलगुन बसतोस जिला !!”

“तू कधीही खोडतोस कधी मला, अन विसरुन जातोस पुन्हा.
माझ्या माथी ओरबडल्याचे व्रण, अन अपुर्णतेचा गुन्हा !!”

मी मनातुन हसत होतो पाहुन त्यांचा अभिनिवेश ..
हसू आलं पाहुन स्वत:च्या ओळींचा परकाया प्रवेश !!

ते पाहुन कविता म्हणाली तुला द्यायला हवी शिक्षा कठोर ..
मी सुचू नये तुला बिल्कुल तू झाला आहेस मुजोर .. !!

त्या दिवसांपासून मित्रहो, ओळी, शब्द, अर्थ घेउन फिरतो आहे..
कविता भेटेल कुठेतरी या आशेत झुरतो आहे . .!

विनायक उजळंबे 

No comments:

Post a Comment

प्रलयगीत

 दिवस मोगरा होतो  रात्र सायली होते ,  तुझिया अस्तित्वाने  श्लोक-शायरी होते।  मी धुनी पेटवत असता तू यज्ञाचे मंतर गाते , मी अलख निरंजन म्हणतो ...